Tuesday, February 3, 2009

विरह

संदिप खरे - नसतेस घरी तू जेंव्हा
नसतेस घरी तू जेव्हा..
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे वीरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकिशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासावीण ह्रुदय अडावे
मी तसाच अगतीक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

संदिप खरे - कसे सरतील सये

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे

सरताना आणि सांग सलतील ना?

गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?



पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा

रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे

उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे

आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी

सोसताना सुखावून हसशील ना?



गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?



कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम

चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच

आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा

चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण

रोज रोज नीजभर भरतील ना?



गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?



इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी

झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या

तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा

पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून

जातांनाही पायभर मखमल ना?



गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?



आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे

माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत

वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले

जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना

तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?



गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

मन - ३ कविता

सुधीर मोघे - मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

बहिणाबाई - मन वढाय वढाय
मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पानावर्हल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!

संदिप खरे - मन तळ्‌यात मळ्‌यात

मन तळ्‌यात मळ्‌यात
जाईच्या कळ्‌यात

मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्‌यात

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात

इथे वाऱ्याला सांगत गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कर नभात

माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्‌यात...