Tuesday, February 3, 2009

मन - ३ कविता

सुधीर मोघे - मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

बहिणाबाई - मन वढाय वढाय
मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पानावर्हल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!

संदिप खरे - मन तळ्‌यात मळ्‌यात

मन तळ्‌यात मळ्‌यात
जाईच्या कळ्‌यात

मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्‌यात

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात

इथे वाऱ्याला सांगत गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कर नभात

माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्‌यात...

1 comment:

Prashant said...

Excellent collection!
thanks

also take a look at one one the blogs i found specially for Kavita
http://ek-kavita.blogspot.com/

I am subscribed to your feed. It is a great collection indeed. Do let me know if you need any help.

Thanks,
Prashant