Tuesday, October 21, 2008

तीन कविता - कुसुमाग्रज

॥ प्रेम ॥
प्रेम कुणावर करावं
कुणावरही करावं

कारण प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकाळातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव !


॥ नाते ॥
नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥

व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्या वाहात जाई ॥

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ।
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ॥

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा ।
मंझिलकी जयाची तारांगणात राही ॥


॥ स्मृती ॥
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात

वा-यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमंत इमारतींचाच थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
तो नदीकिनारा अन भंगला घाट

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नुपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
तू आर्त मला ऎकविलास जो अभंग

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकपरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केंव्हा
ते उदास डोळे त्यातिल करुण विलास

No comments: