वाचलेले पुस्तक - प्रकाशवाटा
काही पुस्तके वाचल्यानंतर आनंदाची जाणीव होते, काही अस्वस्थ करून जातात.... आणि काही आपल्याल्या लज्जित करून सोडतात ... प्रकाशवाटा हे शेवटच्या प्रकारातले पुस्तक ... बाबा आमटेंच्या 'लहान' मुलाचे - डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र. ... हेमलकशा या ठिकाणी मानवी (आणि प्राणी) जीवन सुखद करताना आलेले अनुभव थक्क करून टाकणारे आहेत.
१९७३ साली हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, विलास मनोहर, जगन मचकले, दादा पांचाळ, गोपाळ फडणीस, रेणुका मनोहर आणि आता दिगंत, अनघा व अनिकेत या सार्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे 'प्रकाशवाटा' ..
बिजली, सडक, पानी अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसणा-या भामरागडच्या जंगलात जाऊन पोहोचणं, हाच शहरवासीयांसाठी एक अनुभव ठरे. मग तिथं राहणं, तर मनातही येणं अशक्य. निबीड अरण्य, आपली स्वत:ची अनवट भाषा बोलणारे माडिया गोंड जातीचे आदिवासी आणि सोबतीला असंख्य वन्य प्राणी. किर्र जंगलामुळे संध्याकाळी चार-साडेचारपासूनच अंधारून येई आणि सहा वाजले की काळोखाचं साम्राज्य सुरू होई. वीज-टेलिफोन वगैरे गोष्टी केवळ कल्पनेतल्या. पण १९७३ मध्ये बाबांनी तिथं लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला आणि २५ वर्षांच्या प्रकाशनं तिथं जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं त्यांच्या डॉक्टर पत्नी मंदाकिनी याही त्याच्याबरोबर होत्या. तिथपासून सुरू होऊन दोनवर्शापुर्वी मिळालेल्या 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कारांपर्यंतच्या प्रवासाची कहाणी म्हणजे 'प्रकाशवाटा'. या दाम्पत्यानं हेमलकसा आणि भामरागड परिसरातल्या लोकांनाच आपलसं करून घेतलं असं नाही, तर त्या परिसरातल्या प्राणीमात्रांशीही आगळाच ऋणानुबंध साधला... हे सारं करताना सामोरं येत गेली ती सरकारी अनास्था आणि प्रशासनातील कोरडेपणा. पण या दाम्पत्यानं त्या सर्व प्रसंगांशी केलेला सामना हा छोट्या छोट्या प्रसंगातून पुढे येत जातो आणि आमटे कुटुंबियांचं मोठेपण हे अधोरेखित होत जातं.
पुस्तकाबद्दल अधिक माहिती - http://mr.upakram.org/node/१८६९
हेमलकसा प्रोजेक्टला online मदत पाठविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी डॉ. विकास आमटे यांना लिहिण्यासाठी anandwan[at]gmail.com
--
Nitin Mutha
F-415, CD Sceanic Acres, Near Tata Showroom, Fatorda, Madgaon, Goa, Pin 403602 (http://maps.google.com)
Phone +91 9158900766
No comments:
Post a Comment