Sunday, May 10, 2009

जी ए

कधी तरी (कुसुमगुंजा)
अनुभव कोणाला चुकले नाहीत. पण त्यांचे रुपांतर जर आठवणीत झाले तर मात्र आणखी एक बंधन जखडलेलेच. म्हणून आत्ताच फार वाटते, या दैनंदिन आयष्याचे मलीन वस्त्र फेकून द्यावे व वेळ आहे तोच निसटावे. जाताना दोन-चार व्यक्तींचा निरोप घ्यावा. पण नको. नेमका त्यांचाच तर निरोप नको. नाहीतर जायच्या वेळीच एकाद-दुसरा शब्द स्पष्ट व्हायचा. मुद्दाम काळजीपूर्वक लपवून ठेवलेल्या भावना प्रकट व्हायच्या आणि आणखी एक पाश भोवती पडायचा. तेव्हा नको. त्या भावनांना शब्द नको. उत्कटतेला वाचा नको. भरल्या खोलीतून मागून हळूच जावे, त्याप्रमाणे बाहेर पडावे व निघून जावे. त्यांना नकळत, पण त्यांना आठवत त्यांच्याविषयीच्या भावना घेऊन, त्या पण मूक ठेवून

माणसे: अरभाट आणि चिल्लर
सत्याचा नेहमीच विजय होतॊ - आज ना उद्या ! हे सुत्र कधीच खोटे ठरवता येत नाही, कारण त्यातली मेख आहे ती आज ना उद्या या शब्दात ! माणसाचे आयुष्या टीचभर व काळ अनंत आहे. शतकानुशतके गेली तरी पुन्हा कोडगेपणाने हसत ’आज ना उद्या’ असे म्हणत स्वतःचा आब राखता येतो. पण माणसाची माती देखील नष्ट होऊन जाते आणि तो सत्याच्या विजय-परभवच्या पलीकडे गेलेला असतॊ. म्हणजे एखाद्या दरिद्री माणसच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्याला ’यावर लिहिलेली प्रचंड रक्कम दोनशे लक्ष वर्षे आठ महिने एकोणतीस दिवसांनंतर तुझ्या मालकीची होईल, व तुझे दरिद्र्य नष्ट होईल’ असे सांगण्यासरखे आहे.
देव संकटकाळी मदतीला धावतो, भक्तांना तारतो, ही देखील असलीच सवंग वाक्ये. काकराज, तुम्हीच सांगितले ना की सारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होते? म्हणजे आमचे रक्षण करण्याची त्याला ईच्छा झालीच तर कुठे तो आमचे रक्षण करणार ! संकटे निर्माण करणारा तोच, त्यांतून तारणारा तोच, आणि तशी इच्छा झाली नाही की नष्ट करणार तोच ! त्याच्या इच्छेची वाट पाहत युगे जातील व त्याच्या मदतीची गरजच रहाणार नाही. व्रत-वैकल्ये, जपजाप्य, नवस, भजन, पूजन असल्या उपायांनी त्याच्या मनात आपल्याला अनुकूल अशी इच्छा निर्माण करता येईल, इतका का तॊ बोटचेपा आहे ? असली माणसे आम्हांला खडोगणती माहीत आहेत. पण परमेश्वर देखील तसाच ? छ्ट, त्यावर विश्वास ठेवणे मुढांना अशक्यच आहे. उप्परवालेके घर में देर है, लेकिन अंधेर नहीं !, वा, काय सुरेख अनुप्रास जुळले आहेत ! पण देर तरी का असावा ? ते घर म्हणजे आम्ही दररोज पाहतो तसली कचेरी आहे की काय ? अंधार नाही, प्रकाश आहे का ? चांगली गोष्ट आहे. पण दिवे जळत आहेत म्हणून तत्परतेने काम चालू आहे, असा अर्थ होत नाही. आमच्या कच्ये-यांत रात्रीच काय, दिवसा देखील दिवे जळत असतात. पण बहूधा तेथे कुणीच नसते, किंवा रेकॊर्ड रुमच्या वातवरणात रमीचा डाव, अगर ओली पार्टी चाललेली असते. सगळीकडे नुसते वायदे, आणि वसूल न होणारी उधारी !

माणसे: अरभाट आणि चिल्लर
- आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तूला चमत्कारीक वाटले, अँलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षांनी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कूठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशोब होतो. निदाण शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगताजगता आपली शिक्षा सुरू झालेली असते

No comments: